Thursday, 10 April 2014

Gulab

गुलाब 
गुलाबाचं केवळ नाव मनाला गुलाबी करतं
त्याचं रुप त्याचे रंग सर्वांची मनं जिंकतं
डौलदार काया राजासारखा रुबाब त्याचा
गुणांची खाणच जणू हा राजा सा-या फुलांचा!!१!!
 

कळीसह एक गुलाब दिसतो किती सुंदर
गुंग होते मति जादू करतो मना मनावर
हिरवा कोश लेवून आणखी सुंदर दिसतो
निसर्गासह आम्हीही आनंदाने डोलतो!!२!

पूर्ण उमलेला गुलाब जणू चेहरा सुंदर हसरा
जसा फुलवितो पिसारा तृप्त मोर नाचरा
प्रकार किती  देशी विदेशी गुलाबाचे
सारेच कसे मोहक शेकडो सुंदर रंगाचे!!३!!

विदेशी गुलाब सौंदर्यानी सर्वगुण संपन्न
सुंगधाचा अभाव हेच त्याचे मोठे वैगुण्य
देशी गुलाबाचा सुगंध आकर्षण मधमाशीचे
गुलाबाचे अत्तर गुलाबजल आवडते सर्वांचे!!४!!

शिस्तबध्द रचना फुलांच्या पाकळ्याची कशी
फुलाच्या मधुसंचयाचे उभे अंगरक्षक जशी
गुलकंद पाकळ्यांचा मधुर अमृततुल्य
औषधीय गुणांनी आपल्या ठरतो अमूल्य!!५!!

फुलांचे रंग सुध्दा सांगती भाव आपल्या मनाचे
लालगुलाब सांगती भाव एकमेकावरील प्रेमाचे
पांढरा पिवळा गुलाब प्रतीक निर्मल  प्रेमाचे
सर्वरंगाचा गुलाबगुच्छ प्रतीक निर्भेळ आनंदाचे !!६!!

कोणत्याही रंगाचा गुलाब अपार नेत्रसुख देतो
असो सजावट कुठलीही तिथे चार चांद लावतो
काट्यातून वर आलेला गुलाब उजळुन खुलतो
गुणांनी आपल्या देवाच्या मस्तकी शोभतो!!७!!



No comments:

Post a Comment