Wednesday, 30 April 2014

मोगरा

मोगरा 
मोगरा मला ज्ञानेश्वरांची करुन देतो आठवण
लताच्या मधुर स्वरकळ्यांची त्यात होते पखरण
मोगरा माझ्या माहेरची पण आठवण करुन देतो
पानोपानी बहरलेला मोगरा दृष्टि समोर येतो !!१!!

मोती अन्् मोगरा प्रतिक सौंदर्य सुगंधाचे
मोग-याचा गजरा सौंदर्य खुलवतो रमणीचे
मोत्याचे दागिने न आवडणारी विरळाच असते
सुगंध मोग-याचा वातावरण शीतल करते!!२!!

अश्या सुगंधी मोग-यानी भरुन जातो देव्हारा
नुसत्या आस्तितवाने त्याच्या कमी होतो उकाडा
खूप उन्हाळा खूप सुगंध समीकरण टपो- या फुलांचे
 एक सुगंधी गजरा जुळवितो मनं प्रेमी युगुलांचे !!३!!

हिरवी गार पानं त्यात घोस  शुभ्र फुलं कळ्यांचे
उमलत्या कळ्या सुगंधी हवा सौंदर्य निसर्गाचें
उपयोगी पाने फुलेही औषधं झाडाचे घरच्या घरी
बनवूनी फुलांचे अत्तर मानव  दर्शवी जादुगरी!!४!!

उन्हाळा हिवाळा पावसाळा ऋतु असो कोणताही
निसर्गाच्या जादुई जगात कशाचीही कमी नाही
बटव्यातून काढले शुभ्र सुगंधी फुल मोग-याचे
निसर्गाचे वरदान घेऊनी वैभव वाढवूया त्याचे!!५!!माधुरी!!

जास्वंदी

जास्वंदी
जास्वंदी-जपा कुणी काही म्हणो तिजला
भाग्यवान ती आवडते अति गणपति बाप्पाला
लाल जास्वंदी दुर्वांचा हार कंठी गणेशाच्या
शिरी शोभते लाल जपा कालीमातेच्या!!१!!

बागेमधे जास्वंदी सर्व झाडात उठून  दिसते
सदा लाल फुलांनी झाड़ बहरलेलेअसते
घंटाकृती पाच पाकळ्यांचे फूल रेखीव सुंदर
पराग फुलातला वर राहून ठेवी पाकळीत अंतर!!२!!

जास्वंदीचे कुंपण शोभे छान घराच्या भोवती
हिरवी पाने लाल फुले किती शोभिवंत दिसती
मूळे पाने कळ्या फुले औषधिय गुणांची खाण
तेल पानाफुलांचे केसांसाठी वरदान!!३!!

विविध रंगी जास्वंदी मनमोहक असते किती
गुलाबी अबोली धवल केशरी सुंदर किती दिसती
बागेमधे जास्वंदीची लागवड ख़ास करावी
 औषधिय सेवा तिची जनकल्याणास्तव व्हावी!!४!!

सरबत गुलकंद लाल फुलांचा रक्तशोधक आहे
सुकलेल्या पानाफुलांतही औषधीय गुण आहे
जास्वंदीची कळी आहे औषध रक्त दाबाचे
किती गुण गाऊ अश्या सर्वगुणी जास्वंदीचे !!५!!

जास्वंदी वरदान आहे निसर्गाचे मानवाला
हजारकरानी भरभरुनी दान दिले आम्हाला
ह्या अमूल्य दानाचे सोने करुया कष्टाने प्रेमाने
जोपासूया जास्वंदीला जीवापाड ममतेने!!६!!माधुरी!!








Thursday, 10 April 2014

Gulab

गुलाब 
गुलाबाचं केवळ नाव मनाला गुलाबी करतं
त्याचं रुप त्याचे रंग सर्वांची मनं जिंकतं
डौलदार काया राजासारखा रुबाब त्याचा
गुणांची खाणच जणू हा राजा सा-या फुलांचा!!१!!
 

कळीसह एक गुलाब दिसतो किती सुंदर
गुंग होते मति जादू करतो मना मनावर
हिरवा कोश लेवून आणखी सुंदर दिसतो
निसर्गासह आम्हीही आनंदाने डोलतो!!२!

पूर्ण उमलेला गुलाब जणू चेहरा सुंदर हसरा
जसा फुलवितो पिसारा तृप्त मोर नाचरा
प्रकार किती  देशी विदेशी गुलाबाचे
सारेच कसे मोहक शेकडो सुंदर रंगाचे!!३!!

विदेशी गुलाब सौंदर्यानी सर्वगुण संपन्न
सुंगधाचा अभाव हेच त्याचे मोठे वैगुण्य
देशी गुलाबाचा सुगंध आकर्षण मधमाशीचे
गुलाबाचे अत्तर गुलाबजल आवडते सर्वांचे!!४!!

शिस्तबध्द रचना फुलांच्या पाकळ्याची कशी
फुलाच्या मधुसंचयाचे उभे अंगरक्षक जशी
गुलकंद पाकळ्यांचा मधुर अमृततुल्य
औषधीय गुणांनी आपल्या ठरतो अमूल्य!!५!!

फुलांचे रंग सुध्दा सांगती भाव आपल्या मनाचे
लालगुलाब सांगती भाव एकमेकावरील प्रेमाचे
पांढरा पिवळा गुलाब प्रतीक निर्मल  प्रेमाचे
सर्वरंगाचा गुलाबगुच्छ प्रतीक निर्भेळ आनंदाचे !!६!!

कोणत्याही रंगाचा गुलाब अपार नेत्रसुख देतो
असो सजावट कुठलीही तिथे चार चांद लावतो
काट्यातून वर आलेला गुलाब उजळुन खुलतो
गुणांनी आपल्या देवाच्या मस्तकी शोभतो!!७!!



Friday, 4 April 2014

अबोली


अबोली
एक नार चालली माळून अबोलीचा गजरा
वारंवार तिच्यावर वळती अनेकांच्या नजरा
जो तो मागतो अबोली मोग-याची वेणी
खरच अबोली चे फुलं आहे मोठे गुणी-!!१ !!

अबोली फुलांचा रंग आहे मोठा ख़ास
गुलाबी भगवा  मिसळीचा होतो आभास
सुंदर आकार डौल नितळ पाकळ्यांचा
कोशात उभे रुबाबात बाणा निर्मळतेचा !! २ !!

बाराही महीने या फुलांना येतो सदा बहर
सेवेला सर्वांच्या सकाळ संध्याकाळ हज़र
हवा पाणी असो कसेही थंडी वारा पाऊस
आमच्या अबोलीला सतत हसायची हौस !!३ !!

लेकुरवाळी आहे वरदान तिला देवाचे
पाणी पडताच रोपावर बीज होते मातीचे
एकाचे चार होतात बहर येतो फुलांना
कमी न होता फुलांची आनंद मिळतो सर्वांना !!४ !!

सुगंधाचा अभाव म्हणून का नाव अबोली
सर्वांच्या मनात आपल्या रंग रुपाने सजली
देव मानव सर्वाच्याच सेवेत सदा असते
अबोली नाव सार्थक तिला सर्वांसाठी झटते !!५!!


रंगबिरंगी शेवंती

कोमल पारिजातकाचा ऋतु अस्तावला 
ऋतु मन सुखावणा-या शेवंतीचा ।आला 
पांढरे पिवळे लाल ताटवे शेवंतीचे
पाहतांना नज़र कशी विस्मित होते ।।१!!

निसर्ग कसा मानवाला भरभरुन देतो
ऋतु कोणताही येवो त्याला खुषच करतो
प्रकार किती दाखवावे त्यानी शेवंतीचे
जणू प्रदर्शनच भरविले आपल्या खजिन्याचे ।।२!!

भरीव गोल सुवासिक शेवंती पांढरी शुभ्र
बहरते एवढी की होते अति नम्र
पिवळ्या रोपाचाही तोरा फारच छान 
पांढ-या पेक्षा त्याला कमी नाही मान  ।।३!!

लाल गुलाबी शेवंती जेंव्हा बहरते
मन कसे त्यांच्या रंगाने हरखून जाते 
वाटेपांढरी पिवळी शेवंती तर बागेत असावी
लाल गुलाबीनी पण बाग़ बहुरुन यावी ।।४!!

फुल मोठे डौलदार राणी शेवंतीचे
पांढ-या पिवळ्या कसे छान लाल रंगाचे
यांच्या सोबतीला बटन शेवंतीही  शोभते
मग अश्या बागेला गालबोट लावावेसे वाटते।। ५!!माधुरी!!


सोनचाफा

सोनचाफा

नावासारखाच बावनकशी हा वृक्ष सोन्यासारखा
पिवळाधमक चाफा मोहक बघण्यासारखा
नाही नुसता सुंदर सुगंधाला याच्या उपमा नाही
हिरव्या पानातल्या फुलावरुन नज़र जराही हटत नाही!!१!!

जो तो ह्या सोनचाफ्याच्या सुगंधाचा दिवाणा
हातात घेऊन सुवास ध्यावा असे वाटें सर्वांना
कोणीही सुंगधानी भुलतो आपले सारे देहभान
सौंदर्यानी  पण याच्या होतात सर्वच बेभान!!२!!

बागेमधे ह्या झाडाचे अस्तित्व विषेश वाटते 
एक सौंदर्यवती उभी आपल्या सख्यासह भासते
अर्धोन्मिलित कळी पाहून मन कसे डोलते
हिरवे पान सोनेरी कळी दृश्य अद्भुत दिसते!!३!!

पूर्ण उमललेल्या फुलांचे अवर्णनिय सौंदर्य 
रुप एक एक पाकळीचे सोनेरी पिवळे अपूर्व
अजोड सौंदर्य सुगंधाचे झाड़ हे सोनचाफ्याचे
जग सारे याच्याभवती वेडे झाले ह्या गुणांचे ।!४!!




जाईं जुई

जाईं जुई
सुगंधी नाज़ुक पांढरी शुभ्र जाईं जुई
हिला पाहून मन कसे हरखून जाईं
हिरवे गार चमकदार पान ह्या वेलीचे
शोभती त्या मधे गुच्छ ह्या फुलांचे !!१!!

नाज़ुक पाकळ्यांचे नाज़ुक फुल सुगंधी 
कळ्यांच्या गज-यांची वर्णावी कशी धुंदी
जोड़ी ह्या फुलांची  एकमेकाच्या सोबतीला
जाईं जिथे उपस्थित जुई लावी हजेरीला!!२!!

देवी देवतांच्या मस्तकी मुकुट ह्या फुलांचा
सुगंधानीआपल्या गाभारा भरती देवाचा
सरस्वती देवीचा साज शुभ्र उज्वलतेचा
जाईजुईच्या फुलांनी खुले रंग सौंदर्याचा !!३!!

वेलीवर हिरव्या शुभ्र फुले शोभती जशी
निळ्याआकाशी चांदण्या शोभती तशी
सुगंधी फुले अर्क देती अत्तर बनविण्यासाठी
अलौकिक  हे दान त्यांचे देवमानवा साठी !!४!! 

असो उन्हाळा पावसाळा ऋतु हिवाळा
धवल सुगंधी जाईजुईचे हार देवतांच्या गळा
शुभ्र सुगंधी धवलतेचे हिला निसर्गाचे वरदान
जाईजुईची वेल आपल्या बागेची शान !!५!! माधुरी !!


पारिजातक आणि सत्यभामा


बहरला आहे गच्चीवर पारिजातक छान
प्रत्येक फांदीवर फुलांचे तुरे झाडाची शान
रोज़ सकाळी फुलांनी परडी हळूवार भरते
सुगंधानी फुलांच्या माझे मन कसे दरवळते ।।१!!

नाज़ुक किती पण कसे हे लाख मोलाचे
सत्यभामेसाठी कृष्णाने आणले फूल स्वर्गाचे
मोत्या पोवळ्यांचा जणू सड़ा गच्चीवर पडतो
सुगंधानी सारा परिसर दशदिशांनी दरवळतो।।२!!

रांगोळी या फुलांची शोभते कशी देवासमोर
रेशमी धाग्यात गुंफलेल्या फुलांचा मान तसवीरवर
नवल फुलांच्या सुंगधाचे संपूर्ण परिसर दरवळतो
जाणारा येणारा झाडाचा शोध घेत फिरतो!!३!!

कृष्णानी झाड़ लावले अंगणी सत्यभामेच्या 
फुले मात्र पड़ायची अंगणी रुक्मीणीच्या
नवल वाटें सत्यभामेला ही किमया पाहतांना
कळले प्रेमाला थारा नाही अहंकार असतांना ।।४!!







    

Thursday, 3 April 2014

गुलमोहर आणि जादू




आज गुलमोहर कड़े गेली नज़र
जादू ही कशी ,मनाला आला बहर
काल परवा तर हा होता सुकलेला
आज कसा हिरवा हिरवा दिसतो झालेला !!१!!

ही किमया केवळ त्या निसर्गा ची
वसंतानी चाहुल दिली आपल्या आल्याची
एक पान नव्हतेअचानक झाले हिरवे
वाटे झाडावरुन सर्व आोवाळून टाकावे!!२!!

त्या दिवशी दोन गुलमोहर ताठ उभे होते
होते भलेही सुकलेले आपल्यातच मग्न होते
अचानक तीन चार लोकं कु-हाड घेऊन आले
झाडाच्या आडव्या पसरलेल्या फांद्या छाटू लागले !!३!!

किती नीटनेटके त्यांनी झाडाला होते केले
एकही नव्हते पान पण सर्व बाजूंनी सुडौल झाले
आता ऊन पहा कसे जादु करते त्याच्यावर
हलका हिरवा गडद करते फांद्या फांद्या वर!!४!!

मग येईल उन्हाळा कडक तापेल वातावरण
लाल पिवळा रंग लेवून बहरेल फांदीचा कण कण
पुन्हा होईल जादू बहरुन जाईल संपूर्ण वृक्ष
आपल्या बरोबर जगाने हेच त्याचे लक्ष!!५!!माधुरी!!






मधुमालती

माझ्या मैत्रिणी च्या अंगणात.वेल मधुमालती चा
फुलाकळ्यांनी बहरलेला गुलाबी लाल रंगाचा
पानोपानी फुले कळ्या वरच वर किती जावा
येणा-या जाणा-या च्या माना वरच वर वळाव्या.!!१!!

खालपासून हिरव्या पानांमधे कळ्या फुलांचे गुच्छ
पाहणा-यांना वाटे समोर याच्या सर्व तुच्छ
ही सगळी किमया त्या अंगणातल्या जमीनीची
किती चांगली जोपासना केली तिने रोपाची!!२!!


सूर्याच्या प्रकाशात ख़त पाणी देऊन वाढवले
मायेच्या नजरेने कितीतरी वेळा कुरवाळले
मैत्रीणीने हात पुढे करुन रोपाला सांभाळले
जेंव्हा जेंव्हा रोपाने फांदीशी नाते तोडले!!३!!

मग मात्र रोप सतत फांदी सोबत राहीले
आपल्या पानांफुला सह वर वर जाऊलागले
अनेक फांद्यासह वेल मोठा होऊ लागला
मैत्रीणीच्या हाताला लागेनासा झाला!!४!!

तिने  त्याला फक्तआता नजरेने कुरळावे
त्याच्या गुलाबी कळ्या फुलांचे कौतुक करावे
किती सुंदर हिरवी पाने कळ्याफुलांत पांढ-या छटा
जीवन देऊन पाहत राहीन झालेला तू मोठा!!५!!




कृष्णकमळ

कृष्णकमळ
ईवलेसे रोप लावले होते तेंव्हा
कळलेही नाही एवढे उंच वाढले केंव्हा
हिरव्या हिरव्या पानांनी कसे डवरले
चारी बाजूंनी फांद्या बरोबर वरच वर झेपावले---

रोप वेलात बदलले ख़ाली राहील कसे
आता वरच वर जाणे काम त्याचे हेच असे
आता कळ्या कधी फांदी फांदी रोज पाहते
जांभळ्या रंगाचे फूल पाहण्या कशी मी अधीरते----

आज सकाळी उघडले डोळे पाहीले फांदीला
सुंदर अलौकिक जांभळे पडले दृष्टिला
एक नही चार फुलं देऊन निसर्ग उदार झाला
वर्णन कसे करु आनंद अमाप झाला---

कमळासारखी रचना पाकळ्या नाज़ुक कोमल
पराग उंच मधे एक- पाचांनी केला भोवती गोल
जणू मधला पराग कृष्ण- पाच पांडव सोबती
कौरव जणूू बाहेरच्या पाकळ्या कृष्ण पांडवांना घेरती---

जन्माष्टमी कृष्णाची अन् फुल दिसले वेलाला
निळ्या मोरपिसा जवळ फ़ुल शोभेल शिराला
लीला ही कृष्णाचीच फ़ुल उमलले अष्टमीला
अशीच फुलं येत राहोत माझ्या ह्या वेलाला-----माधुरी--



अलौकिक कमळ

अलौकिक कमळ
लाल सुंदर कमळ देवी लक्ष्मीचे आसन आहे
विष्णु भगवान च्या एका हाती कमळाचे फूल आहे
सृष्टीरचयिता ब्रह्माला कमलासन प्रिय आहे
श्वेतवस्त्रा सरस्वतीला श्वेत कमळ प्रिय आहे!!१!!

देवाधिकांचे आवडते हे फूल किती अलौकिक
ऐकावे तेवढे नवल असा याचा लौकिक
चिखलात जन्म अन् वाढ ,रुप सुंदर किती
चिखलातून पाण्यावर उभे स्वच्छ निर्मळअति !!२!!

सूर्यकिरण येताच कळी कमळाची खुलते
एक एक पाकळी हसत हसत पूर्ण कमळ उमलते
थेंब एकही पाण्याचा स्पर्शत नाही फुलापाना
अलिप्त राहून कार्य करणे हीच शिकवण सर्वांना!!३!!

कमलदलाची उपमा देतात सुंदर डोळ्याना
कमलनयन सुंदर विष्णु आवडतो सर्वांना
कमळांचे हार देवाधिकांच्या कंठी शोभतात
कमळ फुलांचे सौंदर्य सा-या जगी नावाजतात!!४!!

अश्या या गुणांनीच लाडके हे फूल सर्वांचे
गुलाबी कमळ आहे प्रतिक आपल्या देशाचे
सुगंध याचा भंुग्याला कोशाकडे खेचतो
सांज होता कमळाच्या बाहेर येण्यास विसरतो!!५!!

असे हे अलौकिक कमळ अनेक रंगाचे असते
देवाधिदेव महादेवाला नीलकमल आवडते
फुलांची परडी अनेक रंगाच्या कमळांनी भरावी
अन् अश्या रंगबिरंगी कमळांनी चैत्रगौर सजवावी!!६!!माधुरी!!