Wednesday, 10 June 2015

बूच -आकाशमोगरा

बूच -आकाशमोगरा
बूचाचं झाड़ आमच्या शाळेत होतं
ऊँचच ऊच त्याचं किती अप्रुप होतं ।।
फुलांचे कळ्यांचे घोस तर वरच वर
सुगंधानी त्यांच्या दरवऴत असे परिसर।।१।।

ही फुलं हा सुगंध सर्वांना आवडायचा
फुलं ऊंचावरची तोड़ू कशी प्रश्न पडायचा।।
पहाटे पहाटे टप टप फुलं ख़ाली पड़ायची 
आम्हा वेचणा -यांची कशी धांदल उडायची।।२।।

फुलांचे देठ लांब गजरे व्हायचे बिना सुईचे
दोन फुलांची अढी तिसरे फुलं त्यात वळवायचे।।
फुलांचे गजरे हार कसे चटकन करता येतात 
भुलाबाई भोंडलाची पुजा ह्या हारांनीच करतात ।।३।।

ह्या झाडांचे दर्शन सुगंध दुर्मिळ झालं आहे 
असे चांगले झाड़ हरवावे ह्याची फार खंत आहे।।
पूर्वी बूचं बनवायचे ह्या झाडाच्या लाकडाचे
बूचाचे झाड़ हेच संबोधन म्हणून असावे त्याचे।।४।।









बकुळ

बकुळ

चिमणी अन् बकुळीचं झाड़ दुर्मिळ आहे झालं 
चिमणीचं चिवचिवणं फक्त आठवणीत राहीलं ।।
बकुळीचं फुल त्याचा सुगंध छान गजरे फुलांचे
हेही सगळं दुर्मिळ आहे चित्र मनात आठवणीचे।।१।।

जिथे कुठे जंगलात गांवात बकुल वृक्ष दिसतात
त्या परिसरातील लोक बकुळीचे दिवाणे होतात।।
बकुळीच्या सुंदर नाज़ुक फुलांचा मनमोहक सुगंध
भल्या भल्यांना करुन टाकतो सुगंध पाशात बंद।।२।।

कातरलेल्या पाकऴ्या असे  सुंदर घडण बकुलीची
मधोमध फुलाच्या छिद्र जसे हारासाठी सोय निसर्गाची।।
बकुळीच्या ख़ास अत्तराची असे जगात खूप मागणी
दुर्मिळ झाले बकुल वृक्ष कशी होईल ती पुरवणी।।३।।

एक बकुळीचं फुल वहित ठेवायच सुगंधासाठी
कपड्यात ठेवायची ही फुलं कीड न लागण्यासाठी।।
बकुळ झाडाच्या सालीचं पानांच दंतमंजनही करतात
आंबट गोड चवीची बकुळीची फळं सर्वांना आवडतात।।४।।

बकुळीला वाचवायचे प्रयत्न चाहत्यांचे चालू असतात
सिमेंटच्या वाढत्या घरामुळे जंगल सारे नष्ट होतात।।
देवी लक्ष्मीचे कमळ बकुळ फुल असे देवी सरस्वतिचे
तिला नेहमीच हवें हवें अस्तित्व ह्या बकुळ फुलाचे ।।५।।

कोराटी

कोराटी

कोराटीचे वा काटेकोराटीचे फुल पिवळे सान
या फुलाला मिळाला पिवळ्या सोन्याचा मान।।
एक फुल देवाला वाहिल्याने पुण्य मिळते मोठे
एक फ़ुल एक तोळा सोने वचन जरा नसे खोटे।।१।।

आईचे हे वचन आम्ही सदा सत्य मानायचो 
ती म्हणेल तेंव्हा फुलं तोडून आणून द्यायचो।।
काटे बोचायचे पण पुरवत अस़ू तिचा छंद
काट्याचे दु:ख विसरायचो तिचा पाहून आनंद।।२।।

अशी ही कोराटी सदा हवी हवीशी तर वाटते 
पानोपानीच्या काट्यामुळे सदा कोप-यात असते।।
कोराटीच्या फुलांचे गजरे छान विकल्या जातात
म्हणून ह्या झाडांची लागवड  छान प्रमाणात करतात।।३।।

निसर्गाने औषधी गुण प्रत्येक झाडाला दान दिले
कोरांटीची साले पाने दातासाठी उपयोगी केले।।
पिवळ्या कळ्यांनी डवरलेली कोराटी सुंदर दिसते 
सर्व फुलांसह तबकात देवपुजेसाठी हज़र असते।।४।।



रातराणी

रातराणी 
रातराणी कुशलतेने आपले नाव सार्थ करते
सुगंधाचे दाहीदिशांना आपले दूत पाठवते ।।
असो चांदणे वा अंधार दोघांचेही साह्य तिला
सुरवात होते रात्रीच तिच्या सुगंधमय दरबाराला।।१।।

कोणी तिच्या साम्राज्याचे पोवाडे गातात
कोणी तिच्या सुगंधाचा महिमा आळवतात।।
कोणी दूर देशाचे सुगंधाचे व्यापारी असतात
कोणी तिच्या सुगंधाचाच कार्यभार सांभाळतात।।२।।

अश्या सुगंधमय साम्राज्याचे यश काय असावे
अत्तर तेलासाठी दिवसरात्र रातराणीने झटावे ।।
आज संपूर्ण जग रातराणीचाच सुगंध मानते
आमच्या बगिच्यात तिचे एक तरी झाड़ असते।।३।।

रात्रीच्या जीवांना सहारा रातराणी वृक्षांचा
नागराज पण पहुडतात आसरा घेऊन सुगंधाचा।।
जीव मोठा असो वा छोटा भाव मनी सारखेपणाचा
ती साम्राज्ञी रात्रीची गौरव तिच्या महानतेचा।।४।।