Wednesday, 14 May 2014

राणी चमेली


राणी चमेली

वैभवशाली सुगंधित राजघराणे गुणी चमेलीचे
जाईं जुई मोगरा चाफा सायली यांच्या तोलाचे
रंग रुप सुगंध गुण या सर्वांचे सारखे समसमान
दिला त्यांनी चमेलीलाच त्यांच्या राणीचा मान!!१!!

बागेत एखादा असतो चमेलीचा वेल कोप-यात
बाग भरते तिच्या मादक सुगंधाने निमिषार्धात
ताज़े तवाने होते मन केवळ सुगंधानेच फुलांच्या
चंद्रप्रकाशही स्पर्शितो शुभ्र लहरी सुगंधाच्या!!२!!

सांज होताच वेलावर टपो-या कळ्या दिसतात
हळू हळू उमलून वातावरणात सुगंध पसरवतात
लांब दांडीच्या कळ्यांचे गजरे सुगंधी धवल सुंदर
सौभाग्य ललनांचे माळती केसात अष्टौप्रहर!!३!!

दहा बारा लहान पानांचे हिरवेगार त्रिकोणी पान
सुगंधी पांढरी चमेलीची फुलं त्यात शोभती छान
ह्या फुलांचे अत्तर अन् तेल लोकांच्या आवडीचे 
पाने औषाधाचे गुण घेऊन झाले लाडके सर्वांचे!!४!!

मोहक सुगंधाने आपल्या चमेली राणी सर्व फुलांची 
मूळापासून फुलापर्यंत वेल वैद्यकीय सर्वगुणांची
ही जासमिन म्हणजे देवाने दिलेले आहे वरदान 
देवाच्या देव्हारा-यात हिचा आहे मोठा मान!!५!!माधुरी!!